
निफाड न्यूज : चंद्रकांत जगदाळे.
एक काळ असा होता की जिल्ह्याच्या गावी जाणं म्हणजे मोठी गोष्ट समजली जात असे. कारण गावकऱ्यांची बहुतेक कामं ग्रामपंचायत, पंचायत समिती किंवा तहसील कार्यालयातच मिटायची.. मंत्रालयात जाऊन मंत्र्यांशी बोलून काम मार्गी लावणं हे फार मोठं काम मानलं जायचं. अशा काळात गोंदेगावचा महेश मेथे पाटील हा तरुण अवघ्या २५ व्या वर्षी समस्या घेऊन मंत्रालयात पोहोचत होता.. अल्पावधीत ओळख नसताना केवळ धडाडी, बोलण्याची ताकद आणि काम करवून घेण्याची हातोटी याच्या जोरावर मंत्रालयीन दालनात व शासन स्तरावर त्याने आपली वेगळी ओळख तयार केली.
सन २००४–०५ मध्ये शिक्षण विभागाचा एक महत्त्वाचा प्रस्ताव मंत्रालयात अडकून पडला होता. मंत्री वसंत पुरके यांचे शासकीय दौरे महाराष्ट्रभर सुरू असल्याने त्यांच्याशी भेट होत नव्हती.. तेव्हा महेश मेथे पाटील यांनी थेट मुंबई गाठली. कृषी मंत्री बाळासाहेब थोरात, आणि मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची भेट घेऊन विषय मांडायचा ही खूणगाठ बांधून महेश यांनी मंत्रालय गाठले होते. कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घ्यावी या उद्देशाने मंत्रालयाच्या दालनात थोरात साहेबांची वाट पाहणाऱ्या दिग्गजांच्या गर्दीत महेश शांतपणे रांगेत उभा होता.. यावेळी महेश मेथे पाटील यांचे लक्ष गेले ते माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्याकडे.. ते देखील दूधसंघाच्या कामानिमित्त बाळासाहेब थोरात यांची भेट घेण्यानिमित्ताने मंत्रालयात आलेले होते.. महेशने धाडस करून थेट त्यांच्याजवळ जाऊन आपली अडचण सांगितली. कोल्हे साहेबांनीही त्याच्या धडाडीने प्रभावित होऊन मार्गदर्शन दिलं. अवघ्या एका तासात शिफारसपत्र हातात घेऊन महेश थेट शिक्षण विभागात पोहोचला. वसंत पुरके साहेबांचे स्वीय सहाय्यक राजीव पाटील यांच्याकडे पत्र ठेवून त्याने काम व्हायलाच हवं अशी ठाम मागणी केली. त्याच दिवशी पुरके साहेबांच्या बंगल्यावर जाऊन विषय समजावला आणि फाईल अर्थ विभागात पाठवण्याचे आश्वासन मिळवून तो बाहेर पडला. खेड्यातून आलेल्या पंचविशीतल्या तरुणाने एका दिवसात इतके निर्णयात्मक पाऊल टाकणे ही त्या काळात मोठी चर्चा ठरली होती.
याच वेळेस शिक्षण विभागातील ४४ कर्मचाऱ्यांची समस्या प्रलंबित होती. कुणालाही पुढे सरकायची हिम्मत नव्हती. परिस्थिती पाहून महेशने स्वतःहून सर्वांशी समन्वय साधला. कर्मचाऱ्यांशी चर्चा करून त्यांना एकत्र केलं आणि पुढाकार घेतला. त्या ४४ कर्मचाऱ्यांपैकी एक मोहाडीचे जाधव आणि इतर कर्मचारी आजही सांगतात, ‘गोंदेगावचा महेश पाटील नाव ऐकलं की काम होणार म्हणजे होणारच.’ सरकारी अधिकाऱ्यांशी सहज संवाद, मराठी, हिंदी, इंग्रजी तीन भाषांवरील प्रभुत्व आणि अडचणीच्या फाईल्स पुढे ढकलण्याचा आत्मविश्वास या सगळ्यामुळे महेशची प्रतिमा पंचायत समितीपासून विभागीय कार्यालयांपर्यंत पसरली.
BCS शिक्षण पूर्ण करून महेशने वयाच्या २१ व्या वर्षीच शिक्षण विभागात काम सुरू केलं. पण ॲप्रुव्हलच्या अडचणी केवळ त्यालाच नव्हे तर उत्तर महाराष्ट्रातील ४४ कर्मचाऱ्यांना आल्या. आणि मग सुरू झाली त्याची पंचायतीपासून मंत्रालयापर्यंतची धडपड.. समस्येचा खोलात जाऊन शोध घेणं, अधिकाऱ्यांना मुद्दा पटवून देणं आणि काम पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा करणं या सगळ्या गुणांमुळे तो तरुण वयातच ‘काम करवून घेणारा माणूस’ म्हणून ओळखला जाऊ लागला.
आज विंचूर गटातील डोंगरगाव गणात निवडणुकीची हवा चांगलीच उठली आहे आणि चर्चेत एक नाव सतत पुढे येत आहे ते महेश मेथे पाटील. कारण सोपं आहे. तरुण वयात मंत्रालय कामकाज माहीत असणारा, प्रशासकीय नाडी ओळखणारा आणि निर्णयाच्या क्षणी सरळ उभा राहणारा पर्याय प्रत्येक गावाला मिळत नाही. महेश मेथे पाटील यांच्या वागण्यात प्रामाणिकपणा, जिद्द, कष्ट आणि समाजासाठी काही करण्याची धडपड दिसते.. असा उच्चशिक्षित, निष्कलंक आणि कामाचा अनुभव असलेला तरुण राजकारणात असणं ही आजच्या बदललेल्या राजकीय वातावरणाची गरज असल्याचं मत नागरिकांचं आहे आणि त्यामुळेच प्रश्न उभा राहतो असा दांडगा प्रशासकीय अनुभव असलेला पर्याय या निवडणुकीत मिळणार तरी कुठे?