संपादकीय : बिबट्या, भय आणि प्रशासन — देवगावच्या आंदोलनामागचं वास्तव. 

 निफाड न्यूज : चंद्रकांत जगदाळे.
              गेली अनेक महिन्यांपासून निफाड पूर्व भागात दहशत पसरवणारा बिबट्या अखेर देवगाव येथे पिंजऱ्यात अडकला. गत पाच वर्षांपूर्वी बिबट्या हा प्राणी फक्त वन्यजीव म्हणून परिचित होता; परंतु बघण्यात नव्हता. आता अलीकडे मात्र रोजच बिबट्या जेरबंद झाल्याच्या बातम्या कानी येऊ लागल्याने बिबट विषय सवयीचा झाला आहे. परंतु, देवगाव येथे बिबट पकडल्यानंतर ज्या संतप्त प्रतिक्रिया समोर येऊन त्याचे पर्यवसान रास्ता रोको आंदोलनात झाले ते बाकी तालुक्याला आणि जिल्ह्याला अपरिचित होते… ‘बिबट या प्राण्यास कुठेही घेऊन न जाता ठार करा’ ही देवगावकारांची नुसती मागणी नव्हती तर ते ग्रामीण जनतेच्या असुरक्षिततेचं आणि वनविभाग प्रशासनावरील अविश्वासाचं प्रतिबिंब होतं.
              गत काही महिन्यांपासून निफाड पूर्व भागातील मुख्यत्वे देवगाव, देवगाव फाटा परिसरात बिबट्याचे दर्शन, जनावरांची शिकार आणि प्रवाशांवरील हल्ले यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं…शेतकऱ्यांची रात्र झोपेच्या ऐवजी जागरणात जात होती… जनावरे राखताना जीव मुठीत घेऊन लोक शेतात जात… शाळकरी मुलांना एकटं सोडण्याचं धाडस कुणी करत नव्हतं..म्हणजे एकूणच या परिसरात शेतकरी सातच्या आत घरात येई. रात्री अपरात्री बाहेर पडायचे असेल तर सोबती आवश्यक होता. बाहेरगावी गेलेल्या सदस्यांना ‘पाहुण्यांकडे मुक्काम करून सकाळी घरी या’ असे काळजीपूर्वक सांगितले जाई.. मजूर कामास धजावत नव्हते
त्यामुळे शेतीची कामे खोळंबली होती. पहाटे/ सायंकाळी दुग्धव्यावसायिकांत बिबट्याने जबर बसवली होती. त्यामुळे नागरिक व शेतकरी वैतागले होते. अशा स्थितीत, पिंजऱ्यात अडकलेला बिबट्या दिसताच ग्रामस्थांचा संताप उसळणं स्वाभाविक होतं.. एकदाचा तो वैताग आणि चीड काल प्रशासनासमोर बाहेर पडला. परंतु यामागे केवळ भावनिक प्रतिक्रिया नव्हती तर दीर्घकाळ दुर्लक्षित राहिलेल्या प्रश्नांची मालिका होती… वनविभागाच्या यंत्रणेला तक्रारी वेळेवर मिळतात, पण प्रतिसाद नेहमी उशिरा येतो, अशी लोकांची तक्रार आहे. बिबट्यांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थानिक स्वयंसेवक, ग्रामपंचायत आणि वनअधिकारी यांच्यातील समन्वयाचा अभाव दिसतो. परिणामी लोकांच्या मनात प्रशासनाबद्दलचा विश्वास ढळला आहे. एक -दिड महिन्यांपूर्वी नांदगाव येथे एक चिमुकला मका शेतात गेला. त्या भुलभुलैयातुन बाहेर पडू न शकल्याने तो मकामध्येच अडकला होता. यावेळी बिबट्याने त्यास निले असल्याच्या शक्यतेने नागरिकांनी वन कर्मचाऱ्यांशी संपर्क साधूनही वेळेवर तर उपस्थित झाले नाही, अशी ओरड कानी आली होती. सुदैवाने पोलिसांच्या मदतीने तो चिमुकला सापडला म्हणून वनविभागावरील बाळंट टाळले होते. परंतु सुदैव प्रत्येकाचे असेलच असे नाही… वनविभाग प्राशासनाने जर वेळीच ग्रामस्थांच्या मागण्यांकडे लक्ष दिले नाही तर भविष्यात वन्यहिंस्रप्राणी बाजूला राहतील आणि नागरिक व वनविभाग यांच्यातच खटके उडण्याच्या वार्ता कानी येण्यास जास्त दिवस लागणार नाहीत.
     बिबट्या हा वन्य प्राणी आहे, परंतु सिमेंट जंगल वाढते असल्याने वन्य जंगल आटत चालले आहे. मानवी वस्ती आणि शेतजमिनी जंगलात शिरत असल्याने त्यांचा नैसर्गिक अधिवास हरवत असल्याची वन्यजीव अभ्यासकांची ओरड आहे. बिबट अन्न आणि आसऱ्याच्या शोधात गावाकडे येतो, आणि मग माणूस व प्राणी यांचा संघर्ष वाढतो. त्यामुळे उपाय केवळ ‘बिबट्याला ठार मारणे’ एवढाच असू शकत नाही या बाबत सर्वानाच कल्पना आहे. गावांमध्ये बिबट्या पकडण्यासाठी कायमस्वरूपी पथकाची नेमणूक करणे,  शाळा-गावे परिसरात रात्रीच्या वेळी झगमगाट लावणे, पशुधनासाठी सुरक्षित गोठयांची रचना, घरास कंपाउंड, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जनजागृती असे काही उपाय बिबट अभ्यासक सांगतात. हे उपाय देखील नागरिकांनी जवळ करायला हवेत.
      बिबट्या ठार केल्याने भीती तात्पुरती कमी होईल, पण मूळ समस्या सुटणार नाही. एक बिबट जाळ्यात अडकला तर इतर बिबट्याचं काय ? असा प्रश्न ग्रामस्थांनी काल विचारला होता. म्हणजे परिसरात दोन किंवा तीन बिबटे असावेत अशी भीती ग्रामस्थांना आहे. बाकी, देवगावचं आंदोलन हे प्रशासनाला जागं करणारा इशारा आहे… ग्रामीण भागातील लोकसंरक्षणाची आणि वन्यजीव व्यवस्थापनाची नवी धोरणं आखण्याची ही वेळ आहे हे यातून समजून येते.
बातमी शेअर करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
author

निफाड न्यूज

निफाड न्यूज पोर्टलचे संपादक श्री. चंद्रकांत जगन्नाथ जगदाळे हे गेल्या दशक भरापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. नामांकित दैनिकांत त्यांनी ग्रामीण भाग प्रतिनिधी म्हणून कामकाज बघितले आहे. बीकॉम (बँकिंग आणि फायनान्स), बीए (वृत्तपत्रविद्या आणि जनसंज्ञापन), एल एल बी असे शिक्षण त्यांनी घेतले आहे. ग्रामीण साहित्य हा त्यांचा आवडीचा विषय राहिला आहे. नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त ते व्यक्ती आहेत.

Similar Posts

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Translate»
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे