
देवगाव : अमोल तुपे.
नारीशक्तीचा उत्सव म्हणावा असा सोहळा निफाड तालुक्यातील देवगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर रंगला. ‘खेळ रंगला पैठणीचा, सन्मान नारीशक्तीचा‘ या नावाने जि.प. नांदुरमध्यमेश्वर गटातील आर्किटेक्ट अमृता पवार यांनी राबविलेला हा उपक्रम महिलांसाठी केवळ खेळांच्या माध्यमातून मनोरंजन नव्हे, तर आत्मविश्वास, मैत्रीभाव आणि समाजातील महिलांच्या योगदानाचा गौरव करणारा ठरला.
येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या पटांगणात सकाळपासूनच महिलांचा उत्साह ओसंडून वाहत होता. रंगीबेरंगी साड्या, हास्याचा गडगडाट, आणि एकमेकींना प्रोत्साहन देणारा माहोल पाहून गावभर चैतन्याची लाट उसळली होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मयुर चोळके यांनी हलक्याफुलक्या शैलीत करत वातावरण रंगवले.
महिलांसाठी विविध मनोरंजक स्पर्धा उदा. मातीचा चेंडू खेळ, लिंबू चमचा स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, जलद ओळख, नृत्य सादरीकरण अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. प्रत्येक खेळात महिलांचा उत्साह आणि स्पर्धात्मकतेसोबतच हास्य-विनोदाची बरसात झाली. विजेत्यांना आकर्षक बक्षिसांसह खास पैठणी भेट देण्यात आली, ज्यामुळे महिलांच्या चेहऱ्यावर आनंद आणि अभिमान दोन्ही उमटले.

या कार्यक्रमाला स्थानिक ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच, तसेच विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाचे औचित्य अधिकच वाढले. उपस्थित मान्यवरांनी महिलांच्या आत्मनिर्भरतेचे आणि सामाजिक सहभागाचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडताना अमृता पवार म्हणाल्या की, ‘महिलांमध्ये असलेली कला, धैर्य आणि जिद्द ही समाजाची खरी शक्ती आहे. हा उपक्रम म्हणजे त्या नारीशक्तीला वंदन करण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे.अशा कार्यक्रमांमुळे केवळ आनंदच मिळत नाही, तर एकत्र येऊन नवी उर्जा मिळते.’ असे सांगितले. त्यांनी पुढील वर्षी हा उपक्रम अधिक मोठ्या स्वरूपात आयोजित करणार असल्याचे सांगितले.
देवगावच्या या उपक्रमाने केवळ खेळांच्या रंगतदार वातावरणात महिलांचा सन्मान केला नाही, तर नारीशक्तीचा नवा उगवता चेहरा सगळ्यांसमोर आणला, असे महिलांनी सांगितले.