
निफाड न्यूज : श्री. चंद्रकांत जगदाळे.
कोरोनाचा काळ म्हंटला की आजही डोळ्यांपुढे उभे राहते ती भीती, अंधार आणि अनिश्चिततेचं राज्य… परिस्थितीच अशी होती की लोक आपल्या घरात शब्दशः कैद झाले होते.. बाहेर फक्त रुग्णवाहिका, हॉस्पिटलचे सायरन यांचेच आवाज ऐकू येत.. त्यातून जनतेच्या समोर ठाकले होते ते फक्त मृत्यूचे भय… त्या काळात प्रत्येक जण स्वतःचा जीव वाचवण्यात व्यस्त होता; पण काही दुर्मीळ जीव असेही होते, जे इतरांचे प्राण वाचवण्यासाठी पुढे सरसावले. त्यांच्यापैकीच एक तेजस्वी नाव म्हणजे भरवस फाटा (ता.निफाड) येथील स्मृती मेडिकलचे मालक श्री. महेश मेथे पाटील…!
त्या काळात विंचूर गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री.शिवाजी उगले (जय हरी) यांना कोरोना संसर्ग झाल्याचे निदान झाले . प्राणघातक संसर्ग, सगळीकडे गर्दीने भरलेली हॉस्पिटल्स, औषधांची टंचाई आणि भयाची दाट धुकं – अशा भयंकर नकारात्मक प्रसंगी उगले यांनी हतबलतेने एकच फोन केला “महेश, काहीच मार्ग नाही… मदत कर!”
त्या एका शब्दानंतर जे घडलं, ते आजही उगले परिवार विसरलेले नाहीत. मेथे पाटील स्वतः उगले यांच्या घरी गेले. संपूर्ण परिसरात ‘दूर रहा, वावरू नका’ अशी परिस्थिती असताना ते स्वतः औषधांच्या पाकिटासह उगले यांच्या दारात उभे राहिले.. यावेळी मेथे पाटील यांच्या हाती आशेची औषधे दिसत असली तरी त्या पलीकडे हृदयात माणुसकीची ऊब जाणवत होती. हा तो प्रसंग होता की त्या क्षणी भीती हरवली, आणि उगले कुटुंबीयांचा विश्वास जागा झाला.. पाटील यांनी आवश्यक कोरोना प्रतिबंधक औषधे, जीवनसत्वं आणि सल्ला दिला. त्यांच्या शब्दांमध्ये धीराची शक्ती आणि सेवाभावाची पवित्रता असल्याने काही दिवसांत उगले यांनी प्रकृती सुधारत पुन्हा जीवनाचा श्वास घेतला.. या प्रसंगाबद्दल निफाड न्यूज सोबत बोलतांना उगले म्हणतात की, “त्या काळात सगळे मागे हटले होते. पण महेश माझ्या दाराशी आला, औषध घेऊन नव्हे, तर विश्वास घेऊन. काळ आला होता परंतु, मेथे पाटील यांच्या मदतीने काळावर मात करू शकलो.”
हा प्रसंग केवळ एका व्यक्तीच्या मदतीचा नाही, तर ‘नेतृत्व म्हणजे काय असतं’ याचं सजीव उदाहरण आहे.
महेश मेथे पाटील यांनी त्या कठीण काळात अनेक गरजूंपर्यंत मदतीचा हात पोहोचवला. कोठे औषधे, कोठे अन्नधान्य, तर कोठे फक्त धीराचे शब्द देत त्यांनी सामाजिक भान जपले. त्यांच्या कार्यात कोणताही गाजावाजा नव्हता. तर शांत समर्पण आणि अंतःकरणातून आलेली जबाबदारी यांची सांगड होती.
आज डोंगरगाव गणात जेव्हा त्यांच्या उमेदवारीचा उल्लेख होतो, तेव्हा लोक केवळ विकासाची नव्हे, तर मानवतेची आठवण काढतात. कारण “जो संकटात साथ देतो, त्याच्यावरच विश्वास ठेवावा” हे लोकांना ठाऊक आहे.
महेश मेथे पाटील यांची उमेदवारी म्हणजे अनुभवाचा प्रकाश, संवेदनशीलतेचा स्पर्श आणि लोकसेवेचा जिवंत पुरावा म्हणता येईल. उमेदवारी केवळ मतांची नाही, तर मनांची जिंकणारी आहे. कारण त्यात राजकारण नव्हे, तर मानवतेचा आत्मा जिवंत आहे.