आत्मसन्मान हीच रॅगिंगविरोधी लढ्याची पहिली पायरी” – डॉ. संगीता दोशी…श्रीमान एस.पी. सुराणा विधी महाविद्यालयात रॅगिंगविरोधी व्याख्यान

निफाड न्यूज : प्रतिनिधी. 
           “महाविद्यालयीन जीवनापुरतेच नव्हे, तर सामाजिक स्तरांवरदेखील रॅगिंगचे प्रकार दिसून येत असून हे चित्र भयावह आहे. यामुळे होणारा त्रास हा केवळ शारीरिक मर्यादेत न राहता मानसिक स्वरूप घेतो आणि त्यामुळे एखाद्याचे जीवन संपुष्टात येऊ शकते. रॅगिंगविरोधात उभे राहायचे असेल तर आत्मसन्मान ही पहिली पायरी आहे.अन्यायाविरोधात धीट उभे राहिल्यास आत्मविश्वास कधीही गमावला जात नाही. रॅगिंग होतांना दिसताच त्याविरोधात आवाज उठवणे ही खरी भावी वकिलांची जीत आहे,” असे प्रतिपादन मेडिकल कॉलेजच्या उपप्राचार्या डॉ. संगीता दोशी यांनी केले.
              त्या श्रीमान एस.पी. सुराणा विधी महाविद्यालयात अँटी रॅगिंग सप्ताहानिमित्त (दि. १६) आयोजित रॅगिंगविरोधी व्याख्यानात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पंकज पाळेकर होते. उपप्राचार्य प्रा. परेश शहाणे, अ‍ॅड. अभिलाषा दायमा, अ‍ॅड. ज्योती राऊत व्यासपीठावर मान्यवर म्हणून उपस्थित होते.
                      डॉ. दोशी म्हणाल्या, “रॅगिंगसारखा त्रास केवळ शिक्षणापुरता मर्यादित नसतो, तर तो आयुष्याच्या प्रवासात विविध स्वरूपात भोगावा लागतो. त्यामुळे जेव्हा अन्याय, छळ किंवा शोषण दिसेल तेव्हा धैर्याने त्याविरोधात लढायला शिकणे गरजेचे आहे. रॅगिंगला बळी पडणाराच उध्वस्त होतो असे नाही, तर त्याचे कुटुंबदेखील विस्कळीत होते. वर्चस्वाच्या आसुरी आनंदातून निर्माण होणाऱ्या रॅगिंगला वेळीच आळा घालणे आवश्यक आहे.”
                त्यांनी पुढे सांगितले की, चौकस बुद्धी ठेवल्यास अन्यायग्रस्त व्यक्ती लगेच ओळखता येतो. त्याला मानसिक आधार देत चर्चा केल्यास भविष्यात घडणाऱ्या दुर्घटनांना पायबंद घालता येतो. सामाजिक स्तरांवर रॅगिंगसारखे प्रकार वाढत असताना प्रत्येकाने सजग राहणे अत्यावश्यक आहे. “रॅगिंगसारखे प्रकार रोखले, तर आपण आयुष्याची लढाई जिंकलो असे मानावे,” असे त्या म्हणाल्या.
                यावेळी अ‍ॅड. रुपाली घमंडी, प्रा. प्रणिता डुंगरवाल, ग्रंथपाल रेखा खैरनार, सौ. स्वाती शिंदे, कर्मचारी रोशन देवरे व सुरेंद्र बडोदे कार्यक्रमास उपस्थित राहिले.
               अँटी रॅगिंग सप्ताहानिमित्त महाविद्यालयात निबंध लेखन, घोषवाक्य लेखन व भित्तिपत्रक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या सर्व स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांनी सहभागातून “रॅगिंगमुक्त कॅम्पस” घडवण्याचा निर्धार व्यक्त केला.
बातमी शेअर करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
author

निफाड न्यूज

निफाड न्यूज पोर्टलचे संपादक श्री. चंद्रकांत जगन्नाथ जगदाळे हे गेल्या दशक भरापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. नामांकित दैनिकांत त्यांनी ग्रामीण भाग प्रतिनिधी म्हणून कामकाज बघितले आहे. बीकॉम (बँकिंग आणि फायनान्स), बीए (वृत्तपत्रविद्या आणि जनसंज्ञापन), एल एल बी असे शिक्षण त्यांनी घेतले आहे. ग्रामीण साहित्य हा त्यांचा आवडीचा विषय राहिला आहे. नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त ते व्यक्ती आहेत.

Similar Posts

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Translate»
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे