
निफाड न्यूज : दि. 02
गोंदेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कुरणवस्ती येथे आज (दि.०२) स्व. विनोद विनायक जाधव यांच्या स्मरणार्थ शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. हा उपक्रम विंचूर (ता. निफाड) येथील जाधव व निकाळे परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाअंतर्गत शाळेतील तसेच अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या, कंपास पेटी, वॉटर बॅग, सतरंजी आदी शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह दिसून आला. विंचूर येथील रहिवाशी व सध्या लंडन येथे वास्तव्यास असलेले श्री.पंकज निकाळे, श्री. मृणाल निकाळे, श्री.ऋषिकेश जाधव, श्री.प्रमोद जाधव, श्री. हितेंद्र निकाळे व श्री.अभिलाष निकाळे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकार झाला. कार्यक्रमावेळी विद्यार्थ्यांनी कविता, गीते व नृत्य यांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या सादरीकरणास उपस्थितांनी देखील भरभरून दाद दिली. यावेळी विद्यार्थ्यांना चॉकलेट, आकर्षक भेटवस्तू व विविध बक्षिसांचे वाटप करण्यात आले. यानंतर जाधव व निकाळे परिवाराच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी पावभाजी व स्वीट डिशची विशेष मेजवानी देण्यात आली. त्यामुळे कार्यक्रमात अधिक आनंदाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक श्री.वैभव भातोडे व शिक्षक श्री.निलेश पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री.घनश्याम सानप, पालकवर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अत्यंत प्रेरणादायी व सामाजिक भान जपणारा असा हा उपक्रम राबविल्याबद्दल कुरणवस्ती येथील ग्रामस्थ, शाळा प्रशासन व पालकवर्गाच्या वतीने जाधव व निकाळे परिवाराचे मनःपूर्वक आभार मानले.
