सागर वाघ याचा ग्रामस्थांनी केला सत्कार. सागरच्या कृतीमुळे गोंदेगावकारांची मान उंचावल्याचे महेश मेथे पाटील यांचे मत.

निफाड न्यूज : दि. 07
       गोंदेगाव (ता. निफाड) येथील तरुण सलून व्यावसायिक सागर कचरू वाघ यांनी हरवलेले चार तोळ्यांचे सोन्याचे ब्रेसलेट मूळ मालकाच्या हाती प्रामाणिकपणे सुपूर्द करत समाजात आदर्श निर्माण केला. त्यांच्या या कृतीबद्दल महेश मेथे पाटील यांच्यासह नागरिकांनी सागरचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली. अलीकडेच गावात एका विवाहसोहळ्यातील मिरवणुकीदरम्यान हे ब्रेसलेट हरवले होते. सागर वाघ यांना ते त्यांच्या पार्लरमध्ये आढळले. आजूबाजूला शेकडो अनोळखी लोकांची गर्दी असल्याने मालकाचा शोध घेणे कठीण होते. तरीही त्यांनी कोणताही लोभ न बाळगता हे ब्रेसलेट बाजूला सुरक्षित ठेवले आणि मालक शोधासाठी येण्याची प्रतीक्षा केली. चौकशीअंती ब्रेसलेट हे मुख्याध्यापक अरुण निकम यांचे असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सागर यांनी स्वतः जाऊन ते त्यांच्या स्वाधीन केले. या प्रामाणिकतेने निकम कुटुंब भारावून गेले. या कृत्याची माहिती गावात पसरताच ग्रामस्थांनी सागर यांचा विशेष सत्कार करून त्यांचा प्रामाणिकपणाचा आदर्श संपूर्ण गावासमोर उभा केला. महेश मेथे पाटील यांनी सागरला भगवद्गीता शाल, देऊन सन्मानित केले. यावेळी भाऊसाहेब महाराज वैद्य, डॉ. गोरख शिरापुरे, रझ्झाक पठाण, प्रमोद नाईक, विजय सोमासे, नवनाथ बर्डे आदी उपस्थित होते.
प्रतिक्रिया :-
सागरने केलेलं काम आजच्या काळात फार मोठं आहे. सोनं सापडल्यावर माणसाचं मन ढळतं हे आपण ऐकत आलोय. पण या तरुणाने एक क्षण मनात न आणता ब्रेसलेट परत केलं. समाजात अजूनही चांगुलपणा जिवंत आहे. या कृतीमुळे गावाची प्रतिष्ठा वाढली आहे. आजूबाजूस कितीही निराशेचे ढग असले तरी प्रामाणिकपणा प्रकाश त्यावर भारी पडतो हे सागरने दाखवून दिले.’
 
              महेश मेथे पाटील ( गोंदेगाव) 
बातमी शेअर करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
author

निफाड न्यूज

निफाड न्यूज पोर्टलचे संपादक श्री. चंद्रकांत जगन्नाथ जगदाळे हे गेल्या दशक भरापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. नामांकित दैनिकांत त्यांनी ग्रामीण भाग प्रतिनिधी म्हणून कामकाज बघितले आहे. बीकॉम (बँकिंग आणि फायनान्स), बीए (वृत्तपत्रविद्या आणि जनसंज्ञापन), एल एल बी असे शिक्षण त्यांनी घेतले आहे. ग्रामीण साहित्य हा त्यांचा आवडीचा विषय राहिला आहे. नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त ते व्यक्ती आहेत.

Similar Posts

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Translate»
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे