चार तोळ्यांचे सोन्याचे ब्रेसलेट परत. गोंदेगावच्या सागर वाघ याचा प्रामाणिकपणा

निफाड न्यूज : दि. 07

आजच्या काळात माणुसकी हळूहळू धुसर होत चालली आहे.. मंदिरातील दानपेट्यांवरही लोभाची सावली पडल्याचे दुःखद चित्र बघायला मिळते आहे. विश्वास, प्रामाणिकपणा आणि सद्भावना नितीमुल्यांचे वजन हलके होत असल्याचे चित्र समाजात ठिकठिकाणी दिसते. अशा काळोख्या वातावरणात एखाद्या व्यक्तीला सोन्याचे ब्रेसलेट सापडावे आणि कोणत्याही स्वार्थाशिवाय ते मूळ मालकाला परत मिळावे; ही केवळ कृती नसून समाजाला जागवणारी एक प्रकाशरेषा ठरते. अंधारमय होत चाललेल्या समाजात नितीमुल्ये जपणारी सुवर्ण व्यक्तिमत्वे अस्तित्वात असल्याचा अनुभव गोंदेगावकरांनी नुकताच घेतला.

झालं असं की, गोंदेगाव येथील अरुण निकम यांच्या मुलाचा विवाहसोहळा मोठ्या उत्साहात पार पडत होता. लग्नापूर्वीची वरमिरवणूक, ढोल-ताशांचा गजर, नातेवाईकांची गर्दी असं एकंदर सगळीकडे आनंदाचं वातावरण भरून वाहत होतं. या मिरवणुकीदरम्यान वरपिता अरुण निकम हे गावातीलच सागर कचरू वाघ यांच्या मेन्स पार्लरमध्ये आले. यावेळी थोड्या गप्पा झाल्या. लग्नाचे आमंत्रण सागर याला देऊन अरुण निकम पुढे गेले. पण नकळत त्यांच्या हातातील चार तोळ्यांचे सोन्याचे ब्रेसलेट पार्लरमध्येच गळून पडले, ही बाब दोघांच्याही लक्षात आले नाही. दरम्यान, सागर पार्लरचं काम उरकत होता. दुकानाला झाडू मारताना त्याच्या नजरेस एक चमक दिसली. जमिनीवर पडलेले सोन्याचे ब्रेसलेट होते. क्षणभर ते खरे सोन्याचे असल्याचे जाणवताच त्याने मित्र विजय सोमसेला दाखवले. सोन्याचे असल्याचे दोघांची खात्री झाली;  पण आता मोठा प्रश्न होता हे ब्रेसलेट कोणाचे ? मिरवणुकीत शेकडो लोक सहभागी झाले आहेत. पार्लरमध्ये दिवसभर ग्राहकांची वर्दळ राहिली. त्यामुळे ब्रेसलेट कोणाचे याचा नेमका अंदाज येत नव्हता. कुणाला थेट विचारावे तर हे माझेच असा दावा सांगण्याचा धोका होताच. म्हणून संयम ठेवत सागरने प्रामाणिकतेचा मार्ग निवडला. जोपर्यंत शोधकर्ता स्वतः येत नाही तोपर्यंत कुणालाही ब्रेसलेटबद्दल सांगायचे नाही असे त्याने ठरवले.

पुढे गेलेल्या वरमिरवणूकीत पाहुण्यांची काहीतरी गडबड जाणवली. वरपित्यांच्या हातातील ब्रेसलेट हरवल्याचे लक्षात येताच पाहुणे, नातेवाईक, गावकरी सर्वत्र शोधु लागले. निकम यांच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. ही बाब सागरने हेरली. हे ब्रेसलेट कदाचित त्यांचंच असावं असा अंदाज आल्याने सागर त्यांच्या जवळ गेला व चौकशी केली. खात्री होताच त्याने ब्रेसलेट निकम यांच्या हाती दिले. क्षणभर स्तब्ध झालेल्या निकम यांनी सागरला घट्ट मिठी मारली. उपस्थित पाहुण्यांनीही टाळ्यांच्या गजरात सागरच्या प्रामाणिकतेचे कौतुक केले. या प्रामाणिकपणाबद्दल गोंदेगावकरांनी सागराचा नुकताच सत्कार केला.

बातमी शेअर करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.
author

निफाड न्यूज

निफाड न्यूज पोर्टलचे संपादक श्री. चंद्रकांत जगन्नाथ जगदाळे हे गेल्या दशक भरापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. नामांकित दैनिकांत त्यांनी ग्रामीण भाग प्रतिनिधी म्हणून कामकाज बघितले आहे. बीकॉम (बँकिंग आणि फायनान्स), बीए (वृत्तपत्रविद्या आणि जनसंज्ञापन), एल एल बी असे शिक्षण त्यांनी घेतले आहे. ग्रामीण साहित्य हा त्यांचा आवडीचा विषय राहिला आहे. नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त ते व्यक्ती आहेत.

Similar Posts

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Translate»
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे