“मतदानास कमी कालावधी राहिलेला आहे. या कमी वेळात देवगाव गटातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी वाडी वस्ती आणि घरोघरी जाऊन छगन भुजबळ यांनी केलेली विकासकामे सांगावीत. मागील वीस वर्षांपासून सुरू असलेली विकासगंगा भविष्यात सुद्धा सुरू राहील, याची काळजी घेण्याचे आवाहन सौ. विशाखा भुजबळ यांनी कार्यकर्त्यांना केले. देवगाव (ता.निफाड) येथे प्रचार कार्यालयाचे उदघाटन आज (दि.१०) भुजबळ यांच्याहस्ते झाले. यावेळी त्या बोलत होत्या.
“देवगाव गटातील प्रत्येक कार्यकर्त्याने युद्धपातळीवर प्रचार करा. प्रचार कार्यालयात ठेवलेल्या प्रचार साहित्याचा जास्तीत जास्त वापर करा. वाडी वस्तीवर पोहचून छगन भुजबळ यांनी देवगाव गटात केलेल्या विकासकामांची माहिती सांगा. विकासगंगा अनेक वर्षे वाहत राहील याची काळजी घ्या. मतदान करण्यासाठी जनजागृती करा. महिलांना मतदान करणेबाबत प्रोत्साहन करा”, अशा सूचना सौ. विशाखा भुजबळ यांनी कार्यकर्त्यांना केल्या.
देवगाव गटातील प्रचारसूत्रे सदर प्रचार कार्यालयातुन हलणार आहेत. यावेळी राष्ट्रवादी नेते भाऊसाहेब भवर, मा. पं. स. सदस्य भाऊसाहेब बोचरे, मा. सरपंच विनोद जोशी, मा. पं. स. सभापती शिवाजी सुपनर, डॉ. श्रीकांत आवारे, मा. पं. स. सदस्य सुरेखा नागरे, उज्वला पैठणकर आदी मंचावर उपस्थित होते.