
निफाड न्यूज : दि.०३.
श्री दत्तांच्या चरणी अखंड भक्तीभाव व्यक्त करण्यासाठी ओझर (ता.निफाड) येथे आयोजित करण्यात आलेला श्री दत्त जयंती उत्सव यंदा अत्यंत उत्साहात साजरा होणार आहे. गुरुवार (दि.०४) रोजी पार पडणाऱ्या या दिव्य सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून भाविकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.
उत्सवाची सुरुवात दुपारी श्रींच्या अभिषेकाने होणार असून त्यानंतर ६.०० ते ६.३० या वेळेत गुणी विद्यार्थ्यांना गौरविण्यात येणार आहे. तसेच ०७ ते ०८ धर्मगुरू अमृताश्रम स्वामी महाराज यांचे प्रवचन आणि त्यानंतर महाप्रसाद आयोजित केला आहे. दत्त भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक श्री. डॉ. शिरीष देव यांनी केले आहे.
प्रतिवर्षी प्रमाणे सामाजिक बांधिलकी जपत एक महत्त्वपूर्ण उपक्रम त्रिदल परिवाराकडून राबविण्यात येत आहे. जनकल्याण रक्तपेढी, नाशिक यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून दुपारी ३ ते रात्री ९ दरम्यान इच्छुक दाते रक्तदान करू शकतील. दत्त जयंती उत्सवाचे यंदाचे सोळावे वर्ष आहे. या दिव्य सोहळ्यामुळे परिसर भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघणार असून भाविक मोठ्या संख्येने सहभागी होण्याची शक्यता आहे.