
क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक प्रसारक संस्था संचलित, माध्यमिक विद्यामंदिर गोंदेगाव येथील 1999- 2000 इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी तब्बल 23 वर्षानंतर भेटले. दिवाळी पार्श्वभूमीवर सोमवारी (दि.04 ) सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांची भेट झाली. मोठ्या कालखंडानंतर विद्यार्थी मित्रांची भेट झाल्यामुळे वातावरणात उत्साह दिसून आला.
या कार्यक्रमासाठी माजी मुख्याध्यापक विठ्ठल बागडे , मंगेश आव्हाड , कैलास भोसले , विश्वनाथ शेवाळे व बापू शेरेकर, मुजीब पठाण यांची उपस्थित होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांचे स्वागत आणि सत्कार करत शिक्षकांना फेटा बांधला. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन- आरती केली. दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. शिक्षक आणि विद्यार्थी यांनी मनोगते व्यक्त करत आपल्या आठवणी आणि भावनांना वाट करून दिली..मनोगते व्यक्त करतांना विद्यार्थ्यांची शिक्षकांप्रती असलेली कृतज्ञता, शाळेविषयी असलेले प्रेम, मित्रांसोबत असलेला जिव्हाळा असे विविध विषय मांडले. शिक्षकांनी सध्याच्या काळात तरुणांपुढील आव्हाने आणि पुढील पिढीसाठी शिस्तीचे महत्व समजावून सांगत मार्गदर्शन केले. या वेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करण्यात आले.