सरकारी योजना नागरिकांपर्यंत पोहचविण्यात पत्रकारांची मोलाची भूमिका : तहसीलदार विशाल नाईकवाडे. निफाड तहसील कार्यालयमार्फत पत्रकारदिन निमित्त पत्रकारांचा सन्मान.

निफाड न्यूज वृत्तसेवा : 
                 “पत्रकार हा लोकशाहीचा आधारस्तंभ आहे. समाजातील सत्य आणि पारदर्शकता जपण्याचे महत्त्वाचे कार्य पत्रकार करतात. त्यांच्या लेखणीमुळे समाजाला योग्य दिशा मिळते. शासनाच्या योजना सोप्या शब्दांमध्ये नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे मोलाचे कार्य पत्रकार करत असल्यामुळे शासनाचा लोकजागृतीचा बराचसा ताण हलका होतो, पत्रकारांचे असे कौतुक निफाड तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी केले.
                 पत्रकार दिनाचे औचित्य साधून (दि.०६) निफाड तहसील कार्यालय येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी अध्यक्षीय भाषण करतांना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. तंबाळे (उपअधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, निफाड), डॉ. कोशिरे (तालुकावैद्यकीय अधिकारी पंचायत समिती, निफाड) अरुण खांगळ (निफाड तालुक्याध्यक्ष), निवासी नायब तहसीलदार श्रीमती खेडेकर, जेष्ठ पत्रकार हरूनभाई शेख आणि शेखर देसाई, विस्तार अधिकारी बोरसे आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात पत्रकारांना लेखणी, डायरी व पुष्पगुच्छ प्रदान करून त्यांचे कार्य गौरवले गेले. उपस्थित मान्यवरांनी पत्रकारांच्या योगदानाची प्रशंसा करत त्यांना प्रेरणा देणारे शब्द दिले.
                ” समाजाचा खरा ‘दर्पण’ पत्रकार आहेत. त्यांच्या कार्यातून लोकशाहीस बळकटी येते. त्यामुळे हा फक्त पत्रकारांचा सन्मान नसून समाजाच्या आवाजाचा सन्मान असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. बातमीचा धांडोळा घेतांना पत्रकार पूर्णवेळ प्रयत्नशील असतात. त्यामुळे वेळेची मर्यादा न पाळता कार्यरत असल्याने त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. म्हणून पत्रकार दिनाचे औचित्य साधून सर्व पत्रकारांची आरोग्य तपासणीचा उपक्रम राबवत आहोत. हा उपक्रम एक दिवसीय नसून वर्षभरात केव्हाही ग्रामीण रुग्णालय निफाड येथे आरोग्य तपासणी करण्याची संधी पत्रकारांना उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पत्रकारितेचा भूतकालीन आढावा आणि वर्तमान परिस्थिती या विषयी त्यांनी भाष्य केले.
              कार्यक्रमाचे प्रास्ताविक नीलेश देसाई यांनी तर सूत्रसंचालन बाजीराव कमानकर यांनी केले.
—————————-
तालुक्याचा ज्ञानकोश बनविण्याचा मानस :- 
                   निफाड तालुक्याला मोठा इतिहास लाभलेला आहे. तो जगभर पोहचावा यासाठी तालुक्याचा ज्ञानकोश बनविण्याचा मानस असल्याचे तहसीलदार नाईकवाडे यांनी सांगत या कार्यात मदत करण्याचे आवाहन त्यांनी पत्रकारांना केले. ज्ञानकोश किंवा संदर्भकोष तयार झाल्यास नागरिक आणि विद्यार्थांना तालुक्याची माहिती सहज उपलब्ध होणार आहे.
बातमी शेअर करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

Similar Posts

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Translate»
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे