निफाड न्यूज वृत्तसेवा :
अर्धशतक पार होऊन देखील वादात असलेल्या शेतरस्त्यास अखेर न्याय मिळाला. महसूल कर्मचाऱ्यांनी अतिक्रमीत क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांशी चर्चा करून हा वाद कायमस्वरूपी सोडविला असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. वर्षोनुवर्षे घोंगडं भिजत पडलेल्या रस्त्यांचा प्रश्न मिटावा, शेतकऱ्यांचे रस्ताप्रश्न दूर व्हावेत यासाठी महाराष्ट्र राज्य शिव पानंद रस्ता समितीच्या माध्यमातून महाराष्ट्रभर चळवळ उभी राहिली आहे. नाशिक जिल्ह्यात देखील शिव पानंद रस्ते, शेतरस्ते, शिवाररस्ते, आदी मार्ग मोकळे करण्यासाठी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी यंत्रणेला कार्यक्रम आखून दिला होता. त्यानंतर निफाड तहसीलदारांनी देखील महसूल यंत्रणेला शेतरस्ते खुला करण्यासाठी आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर (दि. ०३) गोंदेगाव येथे महसूल कर्मचारी आणि शेतकऱ्यांची बैठक पार पडली. यामध्ये ५३ वर्षांपेक्षा जास्त काळ अतिक्रमीत रस्ता खुला करण्यात आला. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना शेतमाल वाहतुकीस मदत होणार आहे.
गोंदेगाव येथील जऊळके रस्त्यालगत काही शेतमालकांच्या रस्त्यांचे अतिक्रमण होते. त्यामुळे पुढील शेतकऱ्यांना शेतजमीन वहिवाट करण्यासाठी रस्ता नव्हता. शिव पानंद रस्ता समितीच्या माध्यमातून त्रस्त शेतकऱ्यांनी शेतरस्ता मिळण्याबाबत निफाड तहसीलदार विशाल नाईकवाडे यांचेकडे अर्ज दाखल केला होता. त्यानुसार लगतच्या शेतकऱ्यांना प्रशासनाने नोटीस बजावून सदर अतिक्रमीत शेतरस्त्यावर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार प्रांताधिकारी हेमांगी पाटील, तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी संतोष डुंबरे, तलाठी सय्यद, महसूल सहाय्यक किशोर गाडे यांनी गावकाऱ्यांसोबत विवादित ठिकाणी भेट देत दोन्ही शेतकऱ्यांशी चर्चा केली. कोर्टात जाणारा वेळ आणि पैशांचा अपव्यय बघता सहमतीने रस्ता खुला करण्याचे ठरले. तसा स्थळ पंचनामा लिहिण्यात आला. त्यानुसार सदर रस्ता खुला करण्यात आला असल्याचे मंडळ अधिकारी संतोष डुंबरे यांनी सांगितले. सदर रस्ता गेली ५३ वर्षांपासून अतिक्रमीत होता.