यंदाचे गोईरत्न पुरस्कार जाहीर… स्व. गोपीनाथ मुंडे जयंती दिनी होणार वितरण.

निफाड न्यूज : दि. ११
                निफाड पूर्व भागात वाहणाऱ्या गोई नदीच्या नावाने गोंदेगाव मधून विशेष कार्य करणाऱ्या नागरिकांना गोईरत्न पुरस्कार दरवर्षी प्रदान केला जातो. कोरोना काळापासून या वितरणास ब्रेक लागलेला होता. परंतु, यंदा या पुरस्कारांची घोषणा आयोजकांनी केली आहे. मा. शिक्षणाधिकारी एकनाथ कांगणे यांचे योगदान लक्षात घेता त्यांना  शैक्षणिक क्षेत्राचा, कोरोना काळात केलेल्या कार्याची दखल घेत डॉ. गोरख शिरापुरे आणि प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या आरोग्यसेविका पूजा रुपटक्के यांना आरोग्य क्षेत्राचा, तर लोकप्रिय मच्छिंद्रनाथ मंदिराचे प्रमुख गुरुवर्य तात्याबाबा भोसले यांना सामाजिक क्षेत्रात केलेल्या भरीव कामानिमित्त ‘गोईरत्न’ पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. उद्या (दि. १२) स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीचे औचित्य साधत गोंदेगाव येथे पुरस्कारांचे वितरण होईल, अशी माहिती आयोजकांनी दिली.
            विविध क्षेत्रांत बहुमोल कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सन्मान या निमित्ताने केला जातो. सन २०१९ मध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस शहाजी भोसले आणि कवी रवींद्र कांगणे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. परंतु त्यानंतर ओढवलेल्या कोरोना संक्रमण काळात या पुरस्काराची घोषणा आणि वितरणात खंड पडला होता. त्यानंतर पुरस्कार वितरण समितीची बैठक नुकतीच पार पडली. त्यात पुरस्कारार्थींच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. तसेच, सदर पुरस्काराचे वितरण प्रत्येक वर्षी स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती दिनी (प्रत्येक वर्षी १२ डिसेंबर) करण्यात येणार असल्याचा ठराव करण्यात आला. शाल, श्रीफळ, गौरवपत्र आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असते. लासलगाव पोलीस स्टेशनचे सहा. पो. नि. भास्कर शिंदे यांचा हस्ते सदर पुरस्काराचे वितरण होईल
बातमी शेअर करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

Similar Posts

2 Comments

  1. avatar
    Dipak Salve says:

    अंगणवाडी सेविका यांनी कोरोना काळात जे कार्य केले त्यांना काही मान सन्मान नाही का महाराष्ट्र सरकार गेले विसरून पण गावातील नागरीक्याच्या तरी लक्ष्यात असेल असे वाटले होते पण काही उपयोग नाही झाला

    1. avatar
      निफाड न्यूज says:

      सर्वांनाच एका वर्षात पुरस्कार दिला तर पुढच्या वर्षी कोणाला द्यायचा ??? पुरस्कार समितीपुढे असंख्य नावे असतील. त्या सर्वांना टप्प्याटप्प्याने प्रत्येक वर्षी पुरस्कार दिला जाणार आहे. सर्वांच्या कार्याची दखल घेतली जाईल.निश्चिंत राहा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Translate»
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे