चंद्रकांत जगदाळे : निफाड न्यूज.
कोरोना काळात बजावलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल गोंदेगाव येथील प्रतिष्ठचा गोईरत्न पुरस्कार डॉ. गोरख शिरापुरे यांना नुकताच जाहीर झाला आहे. सदर पुरस्काराचे वितरण उद्या (दि.१२) स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्ताने विविध मान्यवरांच्या हस्ते होत आहे. एक सामान्य कुटुंबातील मुलगा ते राज्यस्तरीय ओळख असा प्रवास असलेल्या डॉ. शिरापुरे यांच्या जीवनकार्याचा घेतलेला धांडोळा….
अतिसामान्य कुटुंबात जन्म घेऊन वीस वर्षांपूर्वी कोणी डॉक्टरकीचे स्वप्न बघत असेल तर त्याला गावकऱ्यांनी वेड्यातच काढलं असेल. कारण, छोटी मोठी नोकरी मिळविण्याच्या काळात खर्चिक म्हणवल्या जाणाऱ्या डॉक्टरकीचे खूळ कुणाच्या डोक्यात घुसले असेल तर कासार व्यावसायिक असलेल्या बापाने पैसा उभा करावा कसा ? हा प्रश्न गंभीर होता. परंतु, स्वप्न बघणं वेगळं आणि ती प्रत्यक्षात उतरवणं वेगळं…या दोघांतील फरक ओळखून जो मुलगा ध्येयाचा पाठलाग करतो तो विरळ म्हणावा लागेल. हेच विरळपन खंबीरपणे एका मुलाने जाणून घेतले. त्या विरळतेच्या खंबीरतेला बापाची साथ लाभली अन पोरगं डॉक्टर झालं… पहाटे स्वप्न पडावं आणि सकाळी ते अस्तित्वात यावं इतकं ते सोप्प नव्हतं. स्वप्न आणि स्वप्नपूर्ती यातील काळ संघर्षमय होता. कठीण होता. अवघड होता. अडवळणी होता. परीक्षा बघणारा होता. परंतु अशक्य नव्हता – हे गरीबाच्या मुलाने डॉक्टरकीला गवसणी घालत सिद्ध केलं होतं. डॉ. गोरख बाबुराव शिरापुरे हे त्या मुलाचं नाव. अल्पावधीत जिल्हाभरात गाजत असलेलं हे नाव परिस्थितीने तावून सुलाखून निघालेलं आहे. स्वकर्तुत्वाने उभं राहिलं आहे. भविष्यात देखील वेगळ्या उंचीवर जाईल असं निश्चयी आहे. डॉ. शिरापुरे म्हणजे वेगळंच रसायन आहे याचा प्रत्येय तालुकावासीयांना कोरोना काळात घेतला हे नक्की.
पावणे तीनशे लोकवस्तीच निफाड पूर्व भागातील गोंदेगाव. गावामध्ये कासार समाजाची तीन भावांची तीन घरे म्हणजे अल्पसंख्यच.. शेती कसने आणि बांगडी भरण्याचा व्यवसाय करणे हा वडिलोपार्जित व्यवसाय… बाबुराव शिरापुरे यांना पत्नी विमलबाई दोन मुले आणि दोन मुली असं कुटुंब.. मोठा मुलगा गोरख हा अभ्यासात पहिल्यापासूनच हुशार होता. त्याचे दहावी पर्यंत शिक्षण गावातील माध्यमिक शाळेत तर बारावी पर्यंत शिक्षण विंचूर येथील शाळेत झाले. परंतु गोरख यास बालपणापासून डॉक्टरकीचे वेध होते. इनमिन तीन एकर कोरडवाहू शेती, छोटा व्यवसायातुन सुटणारी रोजीरोटी, त्यात मुलींचे लग्न या अडचणींच्या नद्या पार करणं मुश्किल तर त्यात पुन्हा मुलाच्या डॉक्टर होण्याच्या स्वप्नाची भर. परंतु हटेल तो बाप कसला ??? डॉ. शिरापुरे याच्या स्वप्नांना वडिलांनी प्रेरणेचे पंख जोडले. कोपरगाव तालुक्यातील उक्कडगाव येथील मामा लहानू नामदेवशेठ कोळपकर यांनी भाच्यासाठी मदतीचा हात पुढे केला. त्या जोरावर डॉ. शिरापुरे यांनी BHMS साठी त्यांनी संभाजीनगर येथील DKMM महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्या ठिकाणी हॉस्टेलवर राहुन रात्रं दिवस अभ्यास करून डॉ. शिरापुरे यांनी शिक्षण पूर्ण केले. मेहनत, जिद्द, चिकाटीच्या जोरावर सण 2009- 10 मध्ये डॉ. शिरापुरे यास पदवी मिळाली. वर्षभर मुंबई येथील संजीवनी हॉस्पिटल येथे काहीकाळ सेवा बजावली. त्यांनतर ते आजतागायत ते गोंदेगाव येथे प्रॅक्टिस करत आहेत. प्रामाणिकपणा, समर्पण आणि जबाबदारी या त्रिसूत्रीने त्यांनी अल्पावधीत जिल्हाभरात नाव कमावले आहे. प्रश्नांच्या यशस्वी सोडवणूकीस कुशलतेची जोड मिळाल्यामुळे त्यांचा नावलौकिक वाढला. यशस्वी उपचार होत असल्यामुळे मुंबई, पुणे सारख्या शहरांतून रुग्ण तपासणीसाठी गोंदेगावी येत. ते रुग्णांसाठी गैरसोयीचे ठरत असल्याने डॉ. शिरापुरे आता आठवड्यातील तीन दिवस मुंबई येथे रुग्ण तपासणीसाठी उपलब्ध असतात. त्यांनी मूळव्याध, मुतखडा, गळू, कुरूप, केस गळणे, मोस, चेहऱ्यावरील डाग यांवर जर्मन तंत्रज्ञानाद्वारे हजारो रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत. प्रसंगी गरीब रुग्णांवर मोफत उपचार करण्याची सेवा देखील डॉ. शिरापुरे यांनी बजावली आहेत. ‘सेवा परमो धर्म’ हे त्यांनी ब्रीदवाक्य ठरवून घेतलेलं असल्यामुळे गरिबांच्या परिस्थितीची जाणीव त्यांनी आज देखील ठेवलेली दिसते. 2023 -24 या वर्षांत आधुनिक औषधीचे कोर्स (ccmp) धुळे येथून पूर्ण केला. रुग्णांची शंका निरसन आणि त्यांच्या प्रश्नांची यशस्वी सोडवणूक यामुळे अल्पावधीत त्यांनी मिळविलेलं नाव हे गावाच्या शिरपेचात रोवलेला मनाचा तुरा आहे.
डॉ. शिरापुरे यांचं योगदान युवकांसाठी प्रेरणादायी आहे. ग्रामीण भागातील मुलांना योग्य दिशा मिळाल्यास ते देखील उत्तुंग कार्य करू शकतात. जीवनाच्या वेगळ्या उंचीवर पोहचलो तरी पाय जमिनीवरच असावेत – हे त्यांच्या व्यक्तित्वातून शिकण्यायोग्य आहे.
## कोरोना काळात भरीव योगदान ##
जीवघेण्या ठरलेल्या कोरोना संक्रमण काळात कोविड बाधित रुग्णांसाठी डॉ. शिरापुरे देवदूत ठरले होते. एकीकडे बेड मिळविण्यासाठी रुग्णांची होणारी धावाधाव असतांना डॉ. शिरापुरे यांनी कौशल्याचा वापर करून बरेच रुग्णांना विलगीकरण कक्षात सेवा देऊन मोलाची भूमिका बजावली. स्वतःचा जीव धोक्यात घालून रुग्णसेवेसाठी त्यांनी स्वतःला झोकून दिले होते. तत्पूर्वी आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे मोफत वाटप करून गावकऱ्यांच्या हिंमतीला बळ दिले. परिसरातील गावांमध्ये जाऊन आरोग्य शिबीर भरविली. कोरोना बधितांशी संपर्क करून त्यांना हिंमत दिली. लोकांमधील कोरोनाची भीती त्यांनी दूर केली.