चंद्रकांत जगदाळे : निफाड न्यूज.
“अनंत आमुची ध्येयासक्ती, अनंत अन आशा..किनारा तुला पामराला …!”
कवी कुसुमाग्रज यांनी हे केवळ ‘कोलंबसाचं गर्वगीत’ काव्यबद्ध केलं नसून ते गीत अनेक तरुणांचं स्फूर्तीगीत म्हणून पिढ्यानोपिढ्या गायिले जाईल. अथांग असला तरी किनारा असल्याचं भान कोलंबस समुद्राला लक्षात आणून देतो. माणसाच्या स्वप्नांना, आत्मविश्वासाला असा कोणताच किनारा नसल्याचे छातीठोकपणे सांगणारा कोलंबस अनेकांच्या लक्षात राहतो – तो त्याच्या निडर वृत्तीमुळे… या निडर वृत्तीला स्वप्न, मेहनत, संयम आणि चिकाटी या गुणांची साथ लाभली तर हुकलेली संधी पुन्हा नव्याने दार ठोठावते – हे आपल्या उदाहरणातून गायत्री संतोष भोसले हिने पोलिसांची वर्दी मिळवत दाखवून दिले आहे. मजुरी करणाऱ्या आई बापाच्या स्वप्नांचं चीज करणाऱ्या गायत्रीवर परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहेच; शिवाय तिच्या परिस्थितीवर मात करण्याची ‘कोलंबस’ वृत्तीचं देखील कौतुक होत आहे. नुकत्याच लागलेल्या निकालात गायत्रीची निवड संभाजीनगर कारागृह पोलीस म्हणून झाली आहे.