चंद्रकांत जगदाळे : निफाड न्यूज.
परिस्थिती माणसाला झुंजायला शिकवते. गरिबी खायला उठली असेल तर तीला नेस्तनाबूत करण्यासाठी आणि निदान दोन वेळची भाकरी निवांत खायला मिळावी यासाठी तरी माणूस लढाईसाठी प्रवृत्त होतो. उभा राहतो. लढतो. धडपड, तळमळ, अपार मेहनत, कष्ट, ही मूल्ये वाचनात नसली तरी गरिबीमुळे तळहाताच्या रेषांच्या पाऊलवाटेने आचरणात असल्याने साहजिकच यश पायाशी लोटांगण घालते, याची प्रचिती अहिल्यानगर जिल्हा, श्रीरामपूर तालुक्यातील हरिगाव या गावातील पूजा रूपटक्के यांच्या कुटुंबाने घेतली आहे. फिनिक्स भरारी काय असते ते नंदा आणि निवृत्ती रूपटक्के यांच्या अपत्यांनी स्वकष्टाने यश मिळवत दाखवून दिले आहे. रुपटक्के कुटुंबीय म्हणजे गोंदेगाव आरोग्य उपकेंद्रात दहा वर्षे सेवाकाळ असलेल्या पूजा रुपटक्के यांचं कुटुंब… वाचकांसाठी आज त्यांची जीवनकहाणी..
पूजा यांच्या घरात आई, वडील, चार बहिणी आणि एक भाऊ असं सात माणसांचं कुटुंब. आई वडील वगळता घरात कर्ता म्हणवणारे कोणी नसल्यामुळे मुलांच्या शिक्षणासाठी आई मोलमजुरी करायची आणि वडील पंक्चर दुकानात काम करायचे. त्यातील उत्पन्नातून घरगाडा ओढत ताणत चालायचा.. घरात सणवार तर कधी साजरा झाला हे रुपटक्के कुटुंबाला आठवत नाही. खेळण्या बागडण्याच्या वयात ही मुलं परिस्थितीच आभाळ पेलायला तयार होत होती. पूजा या चौथ्या इयत्तेत असल्यापासून श्रीमंत घरांमध्ये धुनी भांडी करण्याच्या कामास लागल्या. बहिणी आणि भाऊ देखील वडील कामास असलेल्या सायकल दुकानात छोटं मोठं काम करायला लागल्या. अशा प्रकारे भातुकली खेळण्याच्या वयात लहान हातांनी संसार गाडा ढकलण्यात हातभार लावला. दिवसभर पडणारे कष्ट आणि अंधारात असलेलं भविष्य प्रकाशात आणायचे असेल तर अभ्यासाला पर्याय नाहीच – हे समजून घेण्यासाठी रुपटक्के कुटुंबीयांना प्रेरणादायी कथांची गरज कधी पडली नाही. अडकून पडाल तर मराल आणि शिकाल तर जग बघाल या विचारांतून ही मुलं उभी राहत होती. धडपडत होती. स्वतःच अस्तित्व उभं करू पाहत होती.
पूजा यांनी हरीगावमधील संत तेरेजा गर्ल्स हायस्कूल मधून शिक्षण पूर्ण केलं. नेतृत्वगुण ठासून भरलेल्या पूजा यांना खरं म्हणजे शिक्षिका व्हायचं होतं.परंतु, या पहिल्याच स्वप्नाला तडा गेला तो आर्थिक परिस्थितीचा. महाविद्यालयात ड्रेस घेण्याइतपत देखील परिस्थिती नसल्याने शिक्षिका व्हायचं स्वप्न हवेत विरलं. तो काळ असा होता की नर्सिंग क्षेत्रात पटकन नोकरी प्राप्त व्हायची. त्यामुळे आवड निवड बाजूला ठेवून पूजा यांनी संभाजीनगर महानगरपालिकेत नोकरीस असलेल्या मामांच्या सल्ल्याने नर्सिंगला प्रवेश घेतला. ते शिक्षण पूर्ण करून श्रीरामपूर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांनी काही काळ सेवा दिली. २०१० मध्ये ओझर येथे कंत्राटी पदावर तीन वर्षे काम केले. या काळात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरूच होता. पूजा सांगतात की, ‘ हा काळ माझ्यासाठी संघर्षमय होता. संघर्षाचं बळ पाचवीला पूजलेलं होतं. रात्री झोपल्यावर स्वप्न पडायची त्यात देखील मी अभ्यास करत असायची. लहान भाऊ, बहिणींचे चेहरे डोळ्यांपुढे दिसायचे आणि पुन्हा मन लावून अभ्यासाला लागायचे. कष्ट, जिद्द, चिकाटी, यशाची तळमळ आणि मूळ म्हणजे कुटुंबाची आर्थिक चणचण दूर व्हावी यासाठी यश मिळवणं गरजेचं होतं.’ जिद्द असल्यामुळे यश लांब राहिलं नव्हतं. एका परिक्षेने कष्टाचं चीज केलं. मेहनत फळाला आली. नाशिक जिल्ह्यात आरोग्यसेविका म्हणून त्यांची नियुक्ती झाली. भाऊ बहिणींच्या शिक्षणाची सोय झाली. त्यात देखील पहिलंच उपकेंद्र मिळालं निफाड तालुक्यातील गोंदेगाव… २०१३ ते २०२३ अशी दहा वर्षे त्यांनी उपकेंद्रात रुग्णांच्या सेवेत दिली. आरोग्य विभागाच्या योजना त्यांनी गावात प्रभावीपणे राबविल्या. या काळात गोंदेगावच्या विकासाच्या, बदलाच्या, महिलांच्या सुख दुःखाच्या त्या साक्षीदार राहिल्या. कामाशी काम हा त्यांचा स्वभाव अनेक महिलांच्या मनात आजही घर करून आहे. उपकेंद्र अंतर्गत येणाऱ्या दहेगाव,भरवस, गोळेगाव, हनुमान नगर, वाहेगाव या गावांमध्ये त्यांनी पायपीट करून सेवा दिली. रुग्णसेवा, सेवेची तळमळ, कष्टांची जाणीव असल्याने त्यांच्याशी महिलावर्ग एकरूप होऊन गेला. महिलांचा प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीपश्चत काळात त्यांनी केलेल्या सेवांचे गुणगान आज देखील होते. तिकडे भाऊ आणि बहिणीने देखील अपयशाला अस्मान दाखवत चांगले दिवस आणले. सातत्याने शाळेत पहिल्या क्रमांकावर असलेला भाऊ इंजिनिअर झाला आहे. तर लहान बहिणी डॉक्टर झाली आहे.
कोरोना काळात देवदूत….
शासकीय सेवेत असल्याने कोरोना काळातील शासन आदेश गावपातळीवर राबविण्याची जबाबदारी ग्रामपंचायतसह आरोग्यसेविकांच्या खांद्यावर होती. त्यात गोंदेगाव आरोग्यसेविका रुपटक्के यांच्याकडे सहा गावांचा भार, त्या गावांच्या ग्रामपंचायत प्रशासनासोबत सातत्याचा संपर्क, शासकीय धोरणांची प्रभावी अंमलबजावणी, आकडेवारी वरिष्ठांना कळवणे अशा विविध आघाड्यांवर त्यांनी लढाई चालू ठेवली. कोविड रुग्णांशी येणारा संपर्क त्यांच्या मनात भीतीचे घर करत होता. ती भीती खरी झाली. कोरोनाबाधित झाल्यानंतर त्यांनी काहीवेळ स्वतःला दूर ठेवले. रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर पुन्हा रुग्णसेवेत झोकून दिले. गावोगावी जाऊन रुग्णांशी संवाद साधला. बाधित रुग्णांना हिंमत दिली. कोरोना विरोधातील लढाईसाठी प्रेरित केले. प्रतिबंधक लसीकरण शिबिरे घेतली. वाड्या वस्त्यांवर जाऊन रुपटक्के यांनी लसीकरण करण्याबाबत प्रबोधन केले. या मेहनतीमुळे लवकर लसीकरण पूर्ण करणारे उपकेंद्र म्हणून गोंदेगाव आरोग्यउपकेंद्राचे कौतुक झाले. आदिवासी वस्तीवरील महिलांना लसीकरण करण्यास प्रेरित करण्यात त्यांनी सिंहाचा वाटा उचलला होता.
गोंदेगावबद्दल त्या म्हणतात…
” गोंदेगाव म्हणजे माझं माहेरगाव…मी या गावची मानसकन्या… येथे मला आई वडिलांचं – भावा बहिणीचं प्रेम मिळालं. मी गावात शासकीय नोकरीत आहे हे कधी जाणवलंच नाही. माहेरवाशीन मुलगी जन्मगावात जशी बागडते तशी मी तब्बल साडेदहा वर्षे गावात सेवा बजावली. माझा जीवघेणा अपघात झाला या काळात गोंदेगावच्या महिलांनी मायेने विचारपूस केली. त्यांच्या संपर्कात असल्याने मी आज ठणठणीत झाली आहे. सध्या माझी बदली त्र्यंबकेश्वर येथे असली तरी माझं मन गोंदेगावात फिरतं. गोईरत्न मिळाल्याचा आनंद अवर्णनीय आणि शब्दबद्ध करण्यापलीकडचा आहे. या गावाला कधीच विसरू शकत नाही.”