निफाड न्यूज वृत्तसेवा : शिरवाडे वाकद.
निफाड तालुक्यातील पिंपळगांव बसवंत येथील पुंडलिक शिंदे व माणिक शिंदे या पिता पुत्रांच्या खुन खटल्यात अजय धाडीवाल व विक्रम धाडीवाल रा.पिंपळगांव बसवंत या दोन सख्खे चुलत भावांना दोषी ठरविण्यात येऊन त्यांना निफाडच्या जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश मा.बी.डी. पवार यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
पिंपळगांव बसवंत येथील अजय धाडीवाल व विक्रम धाडीवाल यांना रेणुका मंदिराचे आवारात येऊन दारु गांजा पिऊन गोंगाट करु नका असे समजावुन सांगणाऱ्या माणिक शिंदे यास शिवीगाळ करण्यात येऊन, ‘तुला पाहुन घेऊ’ अशी धमकी देण्यात आली होती. त्यानंतर दि.१ सप्टेंबर २०२० रोजी सायंकाळी ७:३० वाजेच्या सुमारास माणिक शिंदे हा पारावर बसलेला असतांना अजय धाडीवाल व विक्रम धाडीवाल ह्या दोघा भावांनी माणिक शिंदे यास मारहाण सुरु केली असता, सदर घटना माणिकचे वडील पुंडलिक शिंदे यांनी पाहिल्यावर मुलाला सोडविण्यासाठी गेले तेव्हा अजय धाडीवाल याने माणिक शिंदे यांस, ‘तुला आज संपवुन टाकेल’ असे म्हणत मानेवर व पाठीवर चालू मारला त्यावेळी माणिक खाली पडला. विकास धाडीवाल हा पुंडलिक शिंदे यास मारहाण करत असतांना त्याला बाजूला लोटुन माणिक यांस वाचविण्यासाठी गेलेले वडील पुंडलिक शिंदे यांचेवरही अजय धाडीवाल याने पोटात व मांडीवर चाकु मारला होता. इतर नागरिक त्या ठिकाणी जमा झाल्यावर दोघेही संशयित पळुन गेले होते. जखमी शिंदे पिता पुत्रांना वैद्यकीय उपचारासाठी राधाकृष्ण हॉस्पिटल पिंपळगांव बसवंत येथे दाखल करण्यात आले होते. तेव्हा पुंडलिक शिंदे यांच्या जबाबावरुन पिंपळगांव बसवंत पोलिस ठाण्यात अजय धाडीवाल व विक्रम धाडीवाल यांचेविरुध्द भा.द.वि. ३०७, ३२६, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात येऊन अटक करण्यात आली होती. उपचारादरम्यान माणिक शिंदे व पुंडलिक शिंदे या पिता पुत्रांचे निधन झाले. तपासाअंती निफाडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. या खटल्यात सहाय्यक सरकारी अभियोक्ता ऍड.एस.पी.बंगले यांनी सरकार पक्षाचे वतीने तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक युवराज सैंदाणे यांचेसह एकुण १३ साक्षीदारांची साक्ष नोंदविली व प्रभावी युक्तिवाद केला. पैरवी पोलिस अधिकारी म्हणुन स.पो.नि.एस.जी.शिरोळे यांनी काम पाहिले. न्यायालयासमोर आलेल्या पुराव्यावरुन आरोपी अजय धाडीवाल व विक्रम धाडीवाल या दोघा सख्ख्या चुलत भावांना दोषी ठरविण्यात आले. दोघांनाही भा.द.वि कलम ३०२ अन्वये जन्मठेपेची शिक्षा व पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने कारावास अशी शिक्षा न्यायाधीश बी.डी.पवार यांनी सुनावली आहे.