देवगाव : मनोहर बोचरे
माणूस आणि पाळीव प्राणी यांचे नाते गेल्या कित्येक पिढ्यांपासून खूप जवळचे राहिलेले आहे. इमानदारी निभावताना पाळीव प्राणी कित्येकदा मालकासाठी जीवाची बाजी लावतात. मात्र, माणूसदेखील अनेकदा आपल्या मित्रासाठी असा प्रयत्न करतो. अशीच एक घटना समोर आली असून दिंडोरी तालुक्यातील शिंदवड येथील ओझरखेड कनाॅल नजिक आहेर वस्ती येथील ५० फूट खोल विहिरीत पडलेल्या पाळीव मांजरीला सहावीत शिकणाऱ्या बारा वर्षाच्या मुलांने जीवदान दिले आहे.
शिंदवड येथील सतीश आहेर यांच्या शेतालगत असणाऱ्या विहिरीत रात्रीच्या सुमारास त्यांची पाळीव मांजर पडली. आवाजामुळे मांजर विहिरीत पडल्याचे आहेर यांच्या लक्षात आले.त्याचवेळी आहेर यांचा मुलगा आर्यन सतीश आहेर यांने दोरी आणत मांजरीला वाचविण्यासाठी स्वतः विहिरीत उतरण्याचे ठरविले. वडिलांनी विरोध केला परंतु पाळीव मांजर असल्यामुळे त्याने वडिलांना न जुमानत आपल्या जीवाची पर्वा न करता कमरेला दोरी बांधून विहिरीत उतरला व पाळीव मांजरीला वाचविले. दिवसाही विहिरीत उतरण्याचे धाडस सहसा होत नाही परंतु रात्रीच्या काळोखात बारा वर्षाचा आर्यन ५० फूट खोल विहिरीत उतरला.खेडगाव येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयात इयत्ता सहावीत आर्यन शिकत असुन त्यांनी दाखविलेल्या धाडसाचे सर्व थरातून कौतुक होत आहे.