निफाड न्यूज वृत्तसेवा : दि.१३
महसूल विभागातील महत्त्वाचे घटक असलेल्या कोतवालांच्या हक्कांसाठी नाशिक जिल्हा कोतवाल संघटनेने आवाज उठवला आहे. संघटनेच्या वतीने नांदगाव विधानसभा आ. सुहास कांदे यांना आज (दि.१३) निवेदन देण्यात आले. या निवेदनात गुजरात राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातील कोतवालांना चतुर्थश्रेणी सेवकांचा दर्जा द्यावा, तलाठी भरती व अन्य शासकीय सेवांमध्ये कोतवालांना २५% जागा राखीव ठेवाव्यात या प्रलंबित मागण्यांवर नागपूर हिवाळी अधिवेशनात तोडगा काढण्याची मागणी आ. कांदे यांचेकडे करण्यात आली आहे.
संघटनेच्या मते, सध्या कोतवालांना अपुऱ्या मानधनावर काम करावे लागते. या सेवकांच्या कर्तव्यांचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांना सामाजिक आणि आर्थिक स्थैर्य मिळायला हवे. गावपातळीवर महसूल विभागाचा कणा मानले जाणारे कोतवाल हे एकमेव कर्मचारी असून, त्यांच्या सेवेची योग्य दखल घेतली जावी, अशी संघटनेची मागणी आहे.
नाशिक जिल्हा कोतवाल संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्यांनी सरकारने यावर लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे. किशोर गाडे, योगेश पवार, संतोष पगारे, शुभम गांगुर्डे, ऋषिकेश चकोर आदीनी सदर निवेदन दिले.