निफाड न्यूज : देवगाव प्रतिनिधी.
गेली दिड महिन्यांपासून बिबट्याने देवगाव आणि परिसरात उच्छाद मांडलेला आहे. नागरिक, वाहनचालक, गुराखी यांच्यावर हल्ला होत असल्याने नागरिक धास्तावले आहेत. सायंकाळी देवगाव फाटा ते देवगाव रस्त्यावर नागरिकांचा कर्फ्यु लागला असल्याचे चित्र असून सायंकाळी सातच्या आत घरात अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. परिसरात पिंजरा लावलेला असून देखील बिबट्या अद्याप जेरबंद न झाल्यामुळे नागरिकांनी वनविभागाविरोधात नाराजी व्यक्त केली . पिंजऱ्यांची संख्या वाढवून सदर बिबट्यास लवकर जेरबंद करावे अशी मागणी उपसरपंच लहानू मेमाणे यांनी केली आहे.
परिसरात अनेकांना बिबट्या वारंवार आढळून आल्याने येथील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. निफाड पूर्व भागात बिबट्याने उच्छाद मांडला असून पंधरा दिवसांपूर्वी गोपालनासाठी आलेल्या राज्यस्थानी गोरक्षकावर हल्ला केल्याने तो गंभीर जखमी झाला होता. निफाड पूर्व भागात देवगाव, देवगाव फाटा परिसरात बिबट्याचे सातत्याने दर्शन होत आहे. मागील सप्ताहापासून तीन-चार दुचाकी चालकांवर आणि शेतकर्यांवर प्राण घातक हल्ले बिबट्याने केले होते. दोन दिवसांपूर्वी देवगाव फाट्या नजीक फिरस्ती माता मंदिरा जवळ रात्रीचे वेळी घरी जात असताना कोळपेवाडी येथील रामदयाल जाट, ज्ञानेश देवकर, गोवर्धन चौधरी या ग्रामस्थांवर बिबट्याने हल्ला करून जखमी केले. पाळीव कुत्रे, जनावरे यांच्यावर होणाऱ्या हल्ल्यामुळे पशुपालक भयभीत झालेले आहेत. शेतकरी रात्री घराबाहेर पडण्यास घाबरलेले आहेत. कामगार देखील शेतात येण्यास स्पष्ट नकार देतात. परिणामी, ऐन कामाच्या मोसमात बाहेर गावावरून शेतमजूर आणण्याची खर्चिक कसरत शेतकरी करत आहेत. यापूर्वी वन प्राण्यांकडून मानवी वसाहती जवळ असे प्राणघातक हल्ले झाले नव्हते. मात्र, आता हिंस्त्र प्राण्यांचे गावातलगत व जमिनीवर वास्तव्य वाढू लागल्याने हल्ल्यांची संख्या वाढली असल्याचे स्थानिकांचे मत आहे. बिबट्या जेरबंद करण्यासाठी वन विभागाने ठोस कार्यवाही करावी अशी मागणी देवगावचे उपसरपंच लहानु मेमाणे याच्यासह परिसरातील नागरिकांनी केली आहे.