देशातील पहिल्या श्रीराम सृष्टीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण भव्य दिव्य श्री प्रभूरामचंद्र व सुवर्णमृगाच्या शिल्पाची आकर्षक उभारणी

 

शिरवाडे वाकद :- किरण आवारे. 

“श्री प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या भूमीत माझ्या हस्ते प्रभू श्रीराम सृष्टीचे लोकार्पण होत आहे ही माझ्या दृष्टीने भाग्याची गोष्ट असून यापुढे केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून प्रभू श्रीराम सृष्टीसाठी सर्वतोपरी मदत राहील,”  असे प्रतिपादन भाजपचे उज्जैन येथील खा.महंत उमेशनाथजी महाराज यांनी केले.
श्री प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या तसेच वाल्मिकी रामायणात उल्लेख असलेल्या चासनळीतील श्रीराम सृष्टीत १५ फूट उंचवट्यावर २१ फुटी प्रभू रामचंद्रांचे धनुर्धारी शिल्प व सुवर्णमृग (मारीच) शिल्प उभारणी झाली असून या शिल्पाचे भव्य क्रेन मधून खा.महामंडलेश्वर महंत उमेशनाथ महाराज व शिवानंदगिरी महाराज यांनी पुष्पहार अर्पण, अभिषेक, पूजाविधी करून हजारो भाविकांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले. खा.उमेशनाथ महाराज व महंत शिवानंदगिरी महाराज यांची सजवलेल्या बग्गीतून गावातुन मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत आकर्षक वेशभूषेसह शेकडो महिला, नागरिक, युवक, युवती, लहान बालके राम, सीता, हनुमान, वानरसेना असा पेहराव करून सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला गंगाआरती करण्यात आली. १०१ जोडप्यांच्या हस्ते यज्ञ करण्यात आला.

निफाड व कोपरगाव तालुक्याच्या सरहद्दीवर असणाऱ्या चासनळी येथील गोदावरी तिरावर २० एकरामध्ये महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील ही पहिली श्रीराम सृष्टी आकार घेत आहे. या श्रीराम सृष्टीमध्ये प्रभू श्रीराम जन्मापासून ते शरयू नदीमध्ये जलसमाधीपर्यंत रामायणातील सर्व प्रसंग असे ४२ शिल्प म्युरल प्लेट स्वरूपात २० एकरामध्ये उभारण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने सत्ययुग द्वार, कलियुग द्वार, द्वापारयुग द्वार व वैकुंठद्वार अशी चार प्रवेशद्वार उभारण्यात येणार आहे. गोदातीरावर शरयू घाट, यमुना घाट, गंगा घाट व कावेरी घाट असे पाचशे फुटाचे चार घाट उभारण्यात येणार आहे. ज्या चक्रवर्ती सम्राटांनी देशाला एकसंघ ठेवले अशा १५ साम्राटांची म्युरेल प्लेट, त्यांच्या समोर १५१ फूट ध्वज, तब्बल ५ कि.मी.निनाद होईल अशी ११११ किलो घंटा, वेद, उपनिषदे, अरण्यके, याची माहिती, डॉक्युमेंट्री दालन, दोन ध्यानधारणा केंद्र, गोदावरी नदी पात्रात ५१ फूट उंचीचे शंकर पार्वती मूर्ती, प्रवेशद्वारावर गोमाता, दोन द्वारावर गजलक्ष्मी, एकूण १८ रस्ते त्यांना १८ पुराणांची नावे, त्यांना गंगा, यमुना, कावेरी, नर्मदा, शरयू असे नावे, दररोज रात्री लेझर शो, रामायण रिसर्च सेंटर, सुसज्ज संदर्भ ग्रंथ, वाचनालय, भक्त निवासस्थान, विद्या वाचस्पती होणाऱ्यांसाठी तज्ञ मार्गदर्शक उपलब्ध राहणार आहेत.

 

◆ या श्री प्रभू श्रीराम सृष्टी साठी चासनळी पंचक्रोशीतील भाविकांचा मोठा सहभाग लाभत आहे. त्यासाठी देणगीच्या माध्यमातून ३५ लाख रु.प्राप्त झाले आहे. त्यातून पहिल्या टप्प्यातील प्रभू श्रीरामचंद्र व मारीच शिल्पांची उभारणी करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून पहिल्या टप्प्यात २५० लाख रू.निधी मंजूर झाला असून लवकरच काम सुरु होणार आहे. काम पूर्णत्वानंतर राज्याचे मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे.
सचिन राऊत

बातमी शेअर करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

Similar Posts

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Translate»
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे