
गेली चार टर्म आपण येवला – लासलगाव मतदारसंघातून केवळ आमदार निवडून देत नसून कॅबिनेट नेता निवडून देत आहोत. त्यामुळेच परिसरात विकास बघायला मिळाला आहे. पाचव्या टर्मला देखील कॅबिनेट नेता निवडून द्या ; असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक आणि भाजपा नेत्या सुवर्णा जगताप यांनी केले. महायुतीचे उमेदवार छगन भुजबळ यांच्या प्रचारार्थ सौ. विशाखा भुजबळ यांनी गोंदेगाव येथे महिला मतदारांची भेट घेतली – त्यावेळी झालेल्या कॉर्नर सभेत जगताप बोलत होत्या.
गोंदेगावमधील बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षम झाल्या आहेत. सोबत लाडकी बहीण योजनेचा हातभार लागल्यामुळे महिलांची प्रगतीकडे वाटचाल सुरू आहे. महायुती सत्तेवर आल्यास लाडकी बहीण योजनेचा निधी 1500 रुपये सुरवातीला 2100 रुपये आणि नंतर 3000 रुपये करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सोबत, ग्रामपंचायत इमारत, रस्ते, शाळा, व्यायामशाळा, पाणी, या माध्यमातून गोंदेगावमध्ये विकास झळकत असल्याचे त्यांनी महिलांना सांगितले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.