
मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रांवर मूलभूत सुविधांची उपाययोजना करून मतदारांची कोणतीही गैरसोय होणार नसल्याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केल्या. त्यांनी काल (दि.११) निफाड विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रांची पाहणी करून निवडणूक तयारीचा आढावा घेतला. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी या सूचना केल्या.
आवश्यकतेनुसार मतदान केंद्रांची तात्काळ दुरुस्ती डागडुजी करावी. निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांना पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, सावली, दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांसाठी रॅम्प आदी सुविधा पुरविण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्याप्रमाणे प्रत्येक मतदान केंद्राचे सूक्ष्म नियोजन करुन अंमलबजावणी करावी. पुरेसा सुर्यप्रकाश, रस्ते, विद्युतजोडणी, प्रकाश व्यवस्था यादृष्टीने नियोजन करावे. आयोगाच्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. चूकमुक्त निवडणुकीची संपूर्ण तयारी जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात करण्यासाठी चांगले नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. निफाड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी हेमांगी पाटील, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विशाल नाईकवाडे यांच्यासह स्थानिक प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते
जिल्हाधिकारी जलज शर्मा विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व विधानसभा मतदारसंघातील मतदान तयारीबाबतचा प्रत्यक्ष जाऊन आढावा घेत आहेत.