निफाड न्यूज : दि. 29.
शाळा ही फक्त शिक्षण घेण्याचे ठिकाण नाही तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठीचे विद्यापीठ आहे, असे म्हंटले जाते. मुलांची बुद्धिमत्ता, कलात्मक क्षमता, शारीरिक कौशल्य आणि सामाजिक सहभाग वाढवण्यासाठी नवनवीन उपक्रमांची अंमलबजावणी विविध शाळांकडून केली जाते. याचाच भाग म्हणून डोंगरगाव (ता.निफाड) येथील जिल्हा परिषद मॉडेल शाळेत आज (दि.29) बाल आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थ्यांसह पालकांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा एक सुंदर उपक्रम ठरला. विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे स्टॉल लावलेले होते.भाजी असलेल्या स्टॉलवर मेथी, शेपू, पालक, भेंडी, कोबी, मिरची, टोमॅटो, भुईमूग, शेंगा अशा ताजी भाजी विक्रीसाठी उपलब्ध होती. हा स्टॉल गावकऱ्यांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरले. खवय्यांसाठी इडली, डोसा, पाणीपुरी, थालीपीठ, वडापाव, सँडविच यांसारख्या पदार्थांनी मेळाव्याला चवदार ठसा उमटवला. काही विद्यार्थ्यांनी पेन्सिल, पट्टी, वही, पतंग अशा शालेय साहित्याचेही स्टॉल्स लावले. या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी केवळ विक्रीच नाही, तर व्यवहार, नफा–तोटा, कच्चामाल आणि गुंतवणूक याबाबत अनुभवही घेतला. ग्राहकांना समजून घेणे, संवाद साधणे आणि निर्णय घेणे यामध्येही मुलांचा आत्मविश्वास वाढला. अंदाजे 102 स्टॉल्सवरून 45 ते 47 हजार रुपयांची उलाढाल झाली असल्याचे शाळा प्रशासनाने सांगितले. पालकांनी मुलांना प्रोत्साहन देत ऱ्यांचे कौतुक केले. मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समिती, पालक-शिक्षक संघ आणि माजी विद्यार्थी संघाच्या विशेष प्रयत्नांमुळे हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला. गावातील महिला, पुरुष, पालक आणि माजी विद्यार्थी यांनीही उत्साहाने मेळाव्याचा अनुभव घेतला.

