किरण आवारे : शिरवाडे वाकद
निफाड तालुक्यातील ओझर येथील निवृत्ती ज्ञानेश्वर जाधव रा.आंबेडकरनगर ओझर यांस अल्पवयीन पिडितेच्या छेडछाड प्रकरणी दोषी ठरवत निफाडचे जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.व्ही.गुजराथी यांनी तीन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.
ओझर पोलीस ठाण्यात यासंदर्भात पिडितेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पिडित मुलगी इयत्ता १० वी.च्या क्लासला जात असतांना आरोपी निवृत्ती ज्ञानेश्वर जाधव याने हात पकडुन, ‘तु मला आवडते, मी तुझ्यावर प्रेम करतो, तु माझ्याशी बोलली नाही तर तुझ्या भावाचा बेत पाहिल’ असा दम दिला देऊन पळुन गेला अशी फिर्याद दिली होती. याबाबत बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा २०१२ चे ८ व १२ भा.दं.वि.कलम ३५४(१)(अ) ३५४(ड),५०६ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता. निफाडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात तपासाअंती आरोपत्र दाखल करण्यात आले होते. सदर खटल्यात सरकार पक्षाचे वतीने सहायक जिल्हा सरकारी वकील रमेश कापसे यांनी तपास अधिकारी पोलिस उपनिरिक्षक ए.पी.कवडे, पीडित मुलगी असे एकुण दहा साक्षीदार तपासले. सदर खटल्यात पैरवी अधिकारी पो.ना. संजय आहेर यांनी काम पाहिले. न्यायालयासमोर आलेल्या साक्षीपुराव्यावरुन निवृत्ती ज्ञानेश्वर जाधव यांस दोषी ठरवत बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये तीन वर्ष सक्तमजुरी व १६ हजार रुपये दंड अशी शिक्षा निफाडचे जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.व्ही.गुजराथी यांनी सुनावली आहे. दंडाच्या रक्कमेतुन पिडितेस दहा हजार रुपये देण्याचे आदेश केले आहे.