भुजबळ यांच्या विजयाची ही आहेत कारणे.

चंद्रकांत जगदाळे : निफाड न्यूज. 
             येवला – लासलगाव मतदारसंघात छगन भुजबळ यांनी महाविकास आघाडीच्या माणिकराव शिंदे यांचा पराभव करत पाचव्यांदा विजयश्री खेचून आणली. मागील चार पंचवार्षिकपेक्षा यंदाची निवडणूक भुजबळ यांना आव्हानात्मक होती. या निवडणुकीत मिळालेल्या विजयाबाबत भुजबळ यांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला असता विविध कारणे समोर आली.
१) प्रचारात मराठा चेहऱ्याचा वापर :
          छगन भुजबळ यांच्यापुढे सर्वांत मोठे आव्हान होते ते मराठा समाजाच्या मतांचे.. मनोज जरांगे पाटील यांच्याशी आरक्षण संदर्भात दोन शब्द झाल्यानंतर मराठा समाज काहीसा दुरावलेला होता. अशा वेळी भुजबळ यांनी प्रचारप्रमुखपदी अंबादास बनकर हा  मराठा चेहरा दिला. सोबत, ४६ गावांतून ज्ञानेश्वर जगताप, डॉ. श्रीकांत आवारे, येवला तालुक्यातून साहेबराव मढवई, वसंतराव पवार यांच्याकडे प्रचाराची धुरा सोपविली. त्यामुळे मराठा समाजाचे काही अंशी मते खेचण्यात त्यांना यश आले.
२) संतुलित भूमिकेला प्राधान्य :
         प्रचारात मनोज जरांगे पाटील यांच्यावर थेट टीका टिप्पणी भुजबळांनी टाळल्याने संतुलित भूमिकेला प्राधान्य दिले. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात मनोज जरांगे पाटील यांनी येवला – लासलगावमध्ये कार्यकर्त्यांच्या घरी सांत्वनपर भेट दिल्या – यावेळी अंदरसुल, लासलगाव, खडक माळेगाव येथे झालेल्या सभेबद्दल देखील भुजबळ यांनी प्रतिक्रिया टाळली. परंतु, निवडणूक जिंकल्यानंतर मात्र पत्रकार परिषदेत याबाबत प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली. या संतुलित भूमिकेचा फायदा भुजबळांना झाला.
३) विकासकामांच्या प्रचारावर भर :-
        २००४ पासून ते आजतागायत भुजबळ यांनी येवला – लासलगाव मतदारसंघात केलेल्या विकासकामांची माहिती जाहीर सभांमधून जनतेपर्यंत पोहचवली. सोबत, लाडकी बहीण योजना, सोडविलेला पाणीप्रश्न, रस्तेविकास आणि स्थानिक प्रश्नांची सोडवणूक भुजबळांनी जनतेसमोर मांडली.  त्यामुळे यंदाची निवडणूक ही भुजबळांनी आरोप – प्रत्यारोप करण्यापेक्षा विकासकामांचे श्रेय घेण्याबाबत केंद्रित केली. ही योजना फलद्रुप ठरली.
४) सर्व नेत्यांचे संघटन यशस्वी :- 
          मतदारसंघात मराठा समाजाचे मतदान सर्वाधिक असले तरी इतर समाजाचे अस्तित्व देखील लक्षात घेण्याजोगे होते. प्रचारप्रमुखपदी मराठा चेहरा नेमून इतर समाजातील नेत्यांचे संघटन साधत साधण्याची रणनीती भुजबळ यांनी आखली. मतदारसंघ, निफाड तालुक्यातील ४६ गावे, जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गण, ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्याशी भुजबळांनी संपर्क साधला. अशा रचनात्मक रणनीतीमुळे भुजबळ यांचा विजय सुकर झाला.
५) डिजिटल मीडियाचा खुबीने वापर :- 
              सोशल मीडियाचा खुबीने वापर करत भुजबळ यांनी प्रचारयंत्रणा राबविली. भुजबळ कुटुंबातील आ. पंकज भुजबळ, सौ. विशाखा भुजबळ यांचे प्रचारदौरे, स्वतः भुजबळ यांच्या झालेल्या सभा त्यांनी लाईव्ह केल्या. त्यामुळे भुजबळांचे विकासकामे घराघरात पोहचले. यासाठी विविध यंत्रणा दिवस रात्र राबत होत्या.
६) भुजबळ कुटुंबाचा मतदारांशी थेट संवाद :- 
             आ. पंकज भुजबळ, सौ. विशाखा भुजबळ यांनी मतदारसंघ पिंजून काढला. गृहभेटी आणि कॉर्नर सभांच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधला. छगन भुजबळ यांनी केलेली विकासकामे मतदारांसमोर मांडली. पुढील पंचवार्षिकमध्ये मतदारसंघाची ब्लु प्रिंट प्रभावीपणे पटवून दिली. सौ. विशाखा भुजबळ यांनी लाडकी बहीण योजनेवर भर देऊन महिलांशी साधलेल्या संवादाचे फलित या निवडणुकीत दिसून आले.
७) पाचही वर्षे मतदारांशी कनेक्ट :- 
             छगन भुजबळ हे मंत्रीपदी विराजमान असले तरी पाचही वर्षे आपल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून जनतेशी संबंध ठेवला. येवला येथील मुख्य संपर्क कार्यालय आणि निफाड तालुक्यातील ४६ गावांसाठी विंचूर येथील संपर्क कार्यालय माध्यमातून त्यांनी स्थानिकांचे प्रश्न सोडविले. रेशन बद्दल तक्रारींपासून ते केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांची स्थानिक पातळीवर प्रभावी अंमलबजावणी करण्यात भुजबळ यांच्या यंत्रणेला यश आले. त्याचा देखील परिणाम निवडणूकीत दिसून आला.
बातमी शेअर करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

Similar Posts

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Translate»
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे