
चंद्रकांत जगदाळे : निफाड न्यूज.
येवला – लासलगाव मतदारसंघात प्रथमच दोन राष्ट्रवादीमध्ये मुख्य लढत होत आहे. छगन भुजबळ यांनी मागील चार पंचवार्षिकमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केला होता. यंदा मात्र महायुती पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) उमेदवार म्हणून छगन भुजबळ तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडी पुरस्कृत (शरदचंद्र पवार गट) उमेदवार माणिकराव शिंदे उभे ठाकले आहेत. या दोनही प्रमुख उमेदवारांनी विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून प्रचारसभांचा धडाका लावलेला आहे. निफाड तालुक्यातील ४६ गावांना विकासापासून वंचित ठेवल्याचा मुद्दा माणिकराव शिंदे प्रचारात पुढे करत आहेत. तर, मराठा आरक्षण संदर्भात भुजबळ यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे जरांगे पाटील आणि भुजबळ यांच्यामधील वादाचे पडसाद अजूनही मतदारसंघात उमटत आहेत. त्याच आधारावर माणिकराव शिंदे भुजबळ यांना टार्गेट करत असल्याचे चित्र मतदारसंघात दिसते आहे. तर दुसरीकडे भुजबळ हे विकासाचा मुद्दा प्रभावीपणे मतदारांपुढे मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. गत वीस वर्षांत झालेल्या विकासकामांची माहिती घराघरापर्यंत पोहचवून भुजबळ यांनी निवडणूक विकासकेंद्रित केल्याचे बघायला मिळते आहे.
देवगाव (ता. निफाड) येथे गुरुवारी (दि. १४) सायंकाळी झालेल्या सभेत भुजबळ यांनी केलेल्या ६२ मिनिटांच्या भाषणात ३७ मिनिटे येवला – लासलगाव मतदारसंघात केलेल्या विकास कामांची माहिती देण्यावर घालविली. सात मिनिटांत महायुतीचा जाहीरनामा आणि येत्या पाच वर्षांत करण्यात येणाऱ्या विकासकामांसाठी दिली. त्यांच्या भाषणाचा मोठा भाग विकासकेंद्रित असल्याने ही निवडणूक विकासाच्या मुद्द्याभोवतीच फिरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भुजबळ यांनी आरोग्य, रस्ते, पाणीपुरवठा आदी क्षेत्रांतील विविध विकासकामांचा तपशील मांडत मतदारांशी संवाद साधला. येत्या पाच वर्षांत मतदारसंघात योजिलेली कामांच्या ब्ल्यू प्रिंटचे सादरीकरण केले.